संभूआप्पाची इतर स्थाने व महत्त्व
* मालगांव ( ता.मिरज ) *
मिरजेपासून पूर्वेस सुमारे १० किमी. वर असणारे मालगांव.गावाच्या आरंभीच श्री संभूआप्पाचे बुवाफन यांचा मोठा दर्गा आहे.दर्ग्यास मोठी तटबंदी असून पुराणकालीन प्रवेशव्दार आहे.आंतमध्ये उघड्यावरच बुवाफन यांचा मोठा दर्गा आहे.दर्ग्यास मोठी तटबंदी असून पुराणकालीन प्रवेशव्दार आहे.आंतमध्ये उघड्यावरच बुवाफन महाराजांची तुरबत आहे. श्री संभूआप्पानी मालगांव येथील वास्तव्यात नित्याने तसेच उरुण – इस्लामपूर येथून सलग १२ वर्षे येऊन ओल्या पडदीने समाधी पूजन केल्याचे सांगितले जाते.बुवाफन यांचा कार्य कालावधी श्रीसंभूआप्पाच्या पूर्वी साडेतीनशे वर्षांचा मानला जातो.
दर्ग्या समोरील बाजूस सुमारे अर्धा किमी अंतरावर श्री. संभूआप्पा देवालय आहे.मालगांव येथील वास्तव्यात याच जागेवर बसून संभूआप्पा हातमागावर वस्त्र विणत असत.श्री संभूआप्पाचे भाऊबंध श्री.सालमाळगे यांनी आपल्या घराण्यातील पूर्वज श्री संभूआप्पा यांनी उरुण – इस्लामपूर येथे जिवंत समाधी घेतल्यानंतर त्यांची स्मृती म्हणून हे देवालय बांधले आहे.देवळात उरुण – इस्लामपूर येथील समाधी प्रमाणेच श्री संभूआप्पाची समाधी ( गादी ) आहे. याची पूजा अर्चा, नैमित्तिक कार्यक्रम व देखभाल सध्या श्री.आण्णासाहेब रामचंद्र सालमाळगे करतात.
कार्तिक पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी मालगांव येथील ‘ उरूस’ असतो.यावेळी उरुण – इस्लामपूर येधून श्री.मठकरी यांच्या वतीने नैवेद्य दाखविल जातो.
* शिरोळ ( ता. हातकणगले ) *
गावाचे आरंभीच श्री.बाबय्या स्वामी उर्फ बुवाफन महाराज देवालय आहे. इथेही मोठी तुरबत असून हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे.पूर्वी तुरबती भोवती वाळू होती, ती वाळू घरात व परिसरात पसरल्यास सर्पांपासून संरक्षण लाभते.सर्प येऊ शकत नाही अशी श्रद्धा होती. मालगांव प्रमाणेच येथेही कार्तिक पौर्णिमेनंतरच्या पहिल्या मंगळवारी उरूस भरतो. सध्या येथील पूजा-अर्चा व देखभाल श्री.हिरेमठ करतात.
* इचलकरंजी *
मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी मंदीरातील मागील बाजूस असणाऱ्या सध्याच्या श्री. धोंडीराम कडतारे यांच्या घरामध्ये श्री संभूआप्पा- बुवाफन गादीची प्रतिष्ठापना केलेली आहे.
सुमारे २०० वर्षापूर्वी मठाधिपती श्री.तात्यासाहेब मठकरी उंटावरून भिक्षेसाठी इचलकरंजी येथे येत त्यांचा मुक्कामही असे.आसपासचे कोष्टी समाजातील व इतर भक्तगण दर्शनासाठी येत. बुवा त्यांना प्रसादही देत असत. अनेक वर्षाचा हा नेम होता.एकवर्षी बुवांनी श्री बुवांनी श्री. कडतरें यांना वेताची काठी व निळ्या रंगाची झोळी प्रसाद म्हणून दिली.त्यावेळी श्री.कडतारेंनी मोठ्या भक्तीने तो प्रसाद स्विकारला व घरामध्येच श्री.बुवाफन व श्री संभूआप्पा यांची प्रतिष्ठा केली .
तेव्हापासून आजतागायत इथे दर गुरुवारी भिक्षा मागितली जाते, यातूनच महाशिवरात्री दिवशी भंडारा केला जातो.
उरुण – इस्लामपूर प्रमाणेच वार्षिक कार्यक्रम केले जातात.कार्तिक पौर्णिमेस उरूस भरतो यावेळी भक्तांना फकीर करून कुंड्यातून तांदळाचा प्रसाद दिला जातो.मोहरमवेळी बंडगरमाळावरील पीर भेटीस येतात.सुमारे ५० वर्षापूर्वीची एक सत्य घटना या देवस्थानच्या जागृत स्वरुपाची साक्ष देते. त्यावेळी इचलकरंजी येथीलच सौ.सुभद्रा बंडोपंत बुगड यांना कुष्ठरोग झाल्याने घरी मिसळून घेत नसत.त्यांच्या पतीने दुसरी पत्नी केली होती.तसेच त्यांना अन्न सुध्दा लांबून दिले जाई. यामुळे सौ.सुभद्रा अत्यंत दु:खी होत्या.त्यावेळी श्री.महादेव कबाडे दर गुरुवारी भिक्षा मागत. ( तांदुळ ) एके दिवशी सौ.बुगड यांचेघरी भिक्षेस गेले असता. त्यांनी आपली व्यथा सांगून उपाय विचारला.यावेळी श्री.कबाडे यांनी दररोज श्री.संभूआप्पा- च्या गादीचे दर्शन घेण्याचे सुचविले.त्याप्रमाणे सलग २२ वर्षे सौ.बुगड नित्याने श्री.संभूआप्पाच्या गादीचे दर्शन घेऊ लागल्या. थोडा थोडा करीत २२ वर्षानंतर त्यांचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला. फक्त नाकापाक्षी थोडासाच शिल्लक राहीला.श्री.कडतारे यांचे घरी आजही त्यांचा फोटो लावलेला आहे.
इथून उरुण – इस्लामपूर येथे यात्रेत नैवेद्य येतो.सध्या श्री.धोंडीराम कडतारे नित्यनेम व देखभाल करतात.
* पेठ वडगांव *
पेठ-वडगांव येथे शिंपी गल्लीत श्री.रामचंद्र भाऊसो गाणबावले यांच्या वाड्यात श्री संभूआप्पा- बुवाफन देवस्थान विस्तृत जागेत आहे.
सुमारे १५० वर्षापूर्वीची या मठाची स्थापना असून कार्तिक शुध्द दशमी शके १८२७ म्हणजेच १०० वर्षापूर्वीचा कापडी मंडप ( पाच चांदण्याचा ) आजही इथे चढविण्याची प्रथा कायम आहे.
कै.श्री.पुंडलिक गाणबावले यांची श्री.संभूआप्पावर अपार श्रध्दा होती इतकी की त्यांनी स्वत:च्या गळ्यात श्री संभूआप्पाच्या पादुकांचे छोटे प्रतिक करून बांधले होते.कपडे शिवून त्याची विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय.
कित्येक वर्ष त्यांनी कधी चालत तर कधी घोड्यावरून उरुण-इस्लामपूर वारी केली.एके दिवशी श्री संभूआप्पानी दृष्टांत देऊन प्रतिष्ठापना करण्याविषयी सांगितले.
त्याप्रमाणे ही प्रतिष्ठापना केलेली असून बुवाफन तुरबत व श्री संभूआप्पा गादी स्वतंत्रपणे आहेत.मंदीर अतिशय सुंदर असून सर्व कार्यक्रम इथेही उरुण-इस्लामपूर प्रमाणेच साजरे केले जातात. इथेही खांब उभारून मंडप चढविणे, उरूस, गंधरात्र (संदल ) भावगीत – भक्तिगीत गायन, असे समारंभ होतात.
येथील आणखी एक विशेष म्हणजे मंदिराचे आवारातच समाधीस्थानाच्या डाव्याबाजूस लिंब उंबर व पिंपळ यांचे एकत्रित असे मोठे ( दुर्मिळ ) झाड आहे.या झाडातून १४ वर्षापूर्वी अचानक पाण्याचे तुषार पाझरू लागले.पायथ्याशी असण्याऱ्या कट्ट्यावर हे तुषार पडताच काकवीप्रमाणे घट्ट व चिकट होऊ लागले.लोकांनी कुतूहल म्हणून चाखून पाहिले असता ते अतिशय गोड लागले पडलेल्या लिबांच्या काड्याही अतिशय गोड लागल्या.सुमारे महिनाभर ही गोड व तुषार सुरु होते. आजही या घटनेचे बरेच साक्षीदार इथे आहेत.
येथील सर्व देखभाल व नैमित्तिक, नित्याचे कार्यक्रम गाणबावले कुटुंबीय स्वखर्चाने व सेवाभावी वृत्तीने करतात.कै.पुंडलिक गाणबावले यांच्यानंतर कै.भाऊसो गाणबावले व सध्या श्री.रामचंद्र गाणबावले यांनी ही श्रध्दायुक्त परंपरा राखली आहे.
उत्तर भारत यात्रा, ( प्रामुख्याने हिमालय परिसरातील व दुर्गम भागातील ) केवळ श्री संभूआप्पाच्या कृपेनेच यशस्वीपणे पूर्ण झाल्याची श्री.गाणबावले यांची श्रद्धा आजही कायम आहे.
* काले ( कराड ) *
मांड नदी काठी, काले ता.कराड येथे असणारे श्री संभूआप्पा देवस्थान पाहिल्याबरोबर उरुण इस्लामपूर येथील देवस्थानाची आठवण येते.कारण वास्तुरचना, बांधकाम प्रकार, बांधकाम काळ यामध्ये असणारे कमालीचे साम्य.
श्री. आनंदराव बापू लिपारे यांचे आजोबा कै.बाबाजी लिपारे हे सलग १२ वर्षे इस्लामपूरची वारी करीत होते.ते मंडपाखालचे रोजेही मोठया श्रद्धेने करीत. मठाचे दरवाजे बंद झाल्यानंतर सुध्दा श्री.बाबाजी यांचेसाठी दरवाजे आपोआप उघडले जात असल्याचे सांगितले जाते.
१२ वर्षाच्या अथक् सेवेनंतर श्री संभूआप्पानी दृष्टांत देऊन आता तुम्ही इकडे येण्याचे कष्ट घेऊ नका. मीच तिकडे येईन असे सांगितले. त्याप्रमाणे एका मार्गशीर्ष पौर्णिमेस हातमागातील डबऱ्यातून धूर व ऊदाचा वास येऊ लागला व श्री संभूआप्पा आल्याची खात्री पटली. तेंव्हापासून इथे मार्गशीर्ष पौर्णिमेस उरूस भरतो.रामनवमीस गंधरात्र ( संदल ) होते तर दशमीस भंडरा केला जातो.
तसेच दत्तजयंती दिवशी गलफ घातला जातो व आदले दिवशी गंधरात्र होते.गलफ शिवण्याचा मान श्री.मनोहर बाळू वेल्हाळ यांचे घरी तर गलफ आणणेचा मान श्री.व्यंकनाथ नरसू काकडे यांचे घरी वंशपरंपरागत चालत आला आहे.
दत्तजयंतीचे अगोदर चार दिवस कोळी समाजात व मानकऱ्यांचे घरी डाळ व तांदुळाची भिक्षा मागितली जाते याचवेळी प्रसाद म्हणून खारीख दिली जाते.
आजही प्रत्येक गुरुवारी किमान पाच घरे तरी भिक्षा मागून त्याचा नैवेद्य दाखविला जातो.
सध्या श्री.आप्पा बापू लिपारे, श्री.दीपक मारुती लिपारे व श्री.आनंदराव ज्ञानदेव लिपारे हे प्रत्येकी १-१ वर्ष याप्रमाणे पूजा-अर्चा व देखभाल करतात.
* बावासफा व संभूआप्पा ( कराड ) *
बावासफा व संभूआप्पा चिल्ला जोड कबरीचा असून शनिवार पेठेत यशवंत हायस्कूलसमोरील केंद्र शाळेच्या पश्चिमेला ररत्यालगत सीटी सर्व्हे नंबर १९०/१ मध्ये आहे. सदरच्या दोन्ही कबरीवर कसलेही छत नाही. येथे पूर्वी फकीरांचा तकीया होता व त्या ठिकाणी फकीर रहात असत.१९५० नंतरच्या काळात सदर इमारतीत प्राथमिक उर्दू शाळा नं.५ चे वर्ग बसविले जात असत.सदर देवस्थानच्या पूर्वेस व दक्षिणेस खुली जागा होती.परंतु दोन कबरीच्या कट्ट्या पुरती जागा सोडून बाकी सर्व जागा व तकीया नगरपालिकेने अँक्वायर करून या ठिकाणी प्राथमिक केंद्र शाळेची इमारत बांधली. तसेच या देवस्थानच्या दक्षिणेकडील मोकळ्या जागेत व उत्तरेकडील तकीयाचे जागेत पश्चिमेकडील ररत्याला लागून दुकान गाळे बांधलेले आहेत. बावासफा व संभूआप्पाचे फार मोठे देवस्थान उरुण इस्लामपूर येथे असून दोघा संताचे दोन वेगवेगळे अलिशान घुमट आहेत व त्या ठिकाणी फार मोठा उरूस साजरा केला जातो.संभूआप्पा हे कोष्टी समाजातील होते व ते बावा सफाचे अनुयायी होते.कराडमधील या देवस्थानचे व्यवस्थापक म्हणून बाबुराव ज्ञानू मर्ढे यांची नोंद आहे.सध्या यांची सर्व व्यवस्था अय्युब अब्दुल रहिमान पटेल हे पाहत असतात.या देवस्थानसाठी नगरपालिकेने सहा मीटर लांब सहा मीटर रुंद अशी जागा सोडली आहे. त्यात ४.४ मीटर लांब व ४.२ मीटर रुंद असा कबरीचा कट्टा आहे.
* इतर स्थाने *
>> बेळगांव
>> चंदूर (ता. हातकणंगले)
श्री संभूआप्पांची आरती डाऊनलोड करा.
|
|