श्री. संभूआप्पांबद्दलच्या अनेक आख्यायिका आजही उरूण परिसरातील जुन्या-जाणत्या लोकांकडून ऐकायला मिळतात त्या अशा-
* नगाराभेट *
उरुणात संभूआप्पा नामक एका हिंदु धर्मीयाने मुस्लिम गुरु केला आहे.गुरूचा साक्षात्कार झाल्याचेही तो सांगतो,हे ऐकून कांही मुस्लिम चिडले.मुस्लिम गुरु करण्यास तुला अधिकार काय?वगैरे सवाल खडसावून विचारण्याच्या इराद्याने नगारे-ढोल अशा वाद्यांच्या गजरात ते मिरवणुकीने आले. ‘तुला मुस्लिम धर्माविषयी काय माहिती आहे कां ?’ असे विचारताच संभूआप्पानी एक कोरा कागद देण्यास सांगितले. हाती कोरा कागद येताच संभूआप्पानी तो समोर धरला व संपूर्ण कुराण वाचूव दाखविले.भेदाभेद न मानता मानवता धर्माची शिकवण त्यांनी दिली.संभूआप्पाची ही गुरुवरील अपार निष्ठा पाहून आलेले सारेजण नतमस्तक झाले.परत जाताना आपली आठवण म्हणून सोबत वाजवत आणलेले नगारे तेथेच ठेवले.आजही ‘नगारखान्यात’ हे नगारे असून मंडप चढवितांना,गंधरात्री वेळी ते वाजविले जातात.
* इच्छाभोजन *
श्री संभूआप्पाची सत्वपरिक्षा घेण्याच्या उद्देशाने कांही योगी,साधू आले.त्यांनी स्वत;स सत्पुरुष म्हणवून घेतोस तर आम्हांस ‘इच्छाभोजन’ दे,असा आग्रह धरला.संभूआप्पानी त्यांची इच्छा विचारताच,माघ महिना असून देखिल त्यांनी त्यावेळी तांदळाच्या भाकरी व पिकलेले आंबे मागीतले.हे ऐकताच संभूआप्पाना हसू आले;त्यांनी तेथेच असणाऱ्या एका डालपातीकडे अंगुलीनिर्देश केला अन् उघडून पहाण्यास सांगितले.उघडून पहाताच तो काय ? आंतमध्ये तांदळाच्या भाकरी अन् त्यावर पिकलेले आंबे.ते पहाताच परीक्षा घेण्यासाठी आलेले साधू संभूआप्पाचे ‘साधक’ बनले.
* जास्वंदीची फुले *
संभूआप्पाची वाढत चाललेली ख्याती मनात खुपणारे कांही दुष्ट प्रवृतीचे लोक संभूआप्पाना भ्रष्ट करण्याच्या उद्देशाने भांडयामध्ये मांस घालून त्यावर झाकण ठेवून ते भांडे घेऊन आले.संभूआप्पापुढे ते भांडे पुढे करीत यातील अन्न खाण्याविषयीचा आग्रह धरू लागले.अंतर्मनाने संभूआप्पानी खरा प्रकार ओळखला. त्यांनी त्यातीलच एकाला भांडयाचे झाकण काढण्यास सांगितले,झाकण काढून आत पहाताच सारेजण चकीत झाले कारण भाडयात मांसही नव्हते आणि अन्नही नव्हते,होती फक्त जास्वंदीची फुले !
* दगडांचे आंबे *
संभूआप्पा जादूटोणा करतो.लोकांना फसवितो,तो ढोंगी आहे असे म्हणत काही जणांनी रागाने संभूआप्पाना दगड मारले अन् वरती असशील खराच संत तर या दगडांचे आंबे करून दाखव तरच आम्ही तुझे श्रेष्ठत्व मान्य करू असे सांगितले.संभूआप्पा शांतपणे सारे ऐकून घेतले,कसलाही प्रतिकार केला नाही,डोळे मिटले आणि आपल्या गुरूचा धावा केला.डोळे-उघडले तेव्हा जेवढे दगड संभूआप्पाना मारले होते आणि ज्या दगडाचा संभूआप्पाना स्पर्श झाला होता त्या दगडांचे आंबे झाले होते.
( मतितार्थ : संभूआप्पाच्या सहवासात आलेले निष्ठूर,गुंड प्रवृत्तीचे लोक ही,त्यांच्या स्पर्शाने आब्यांप्रमाणे रसाळ,स्वभावाने गोड.आणि समाजप्रिय झाले.)
* सौदागरास वाचविले *
के दिवशी नेहमीप्रमाणे संभूआप्पाचे जिवलग मित्र खेलजी पाटील आणि पंत अप्पाजी कुलकर्णी सोंगट्या खेळत बसले होते.खेळ इतका रंगला होता की तहान-भुकेची आठवणही कुणास राहिली नाही.अचानक मध्येच संभूआप्पा बेशुद्ध पडले,मित्रांना काय झाले ते कळेना.सुमारे वीस एक मिनटांनी संभूआप्पा शुद्धीवर आले.शुद्धीवर येताच पंतांनी,खेलजींनी काय झाले याची विचारणा केली तेव्हा संभूआप्पानी जे सांगितले त्यांवर मित्रांचा विश्वास बसला नाही,विश्वास न बसणे हे ही स्वाभाविकच होते .संभूआप्पानी सांगितले, ‘तिकडे लांब समुद्रlस भरती आली होती.एक व्यापारी मालाने भरलेले जहाज घेऊन निघाला असता समुद्रच्या भरतीमुळे ते जहाज बुडू लागले.अखेरीस त्याने अंत:करणापासून माझा धावा केला,मी तेथे जाऊन त्याचे जहाज वर काढले. त्याचा माल अन् जीव दोन्हीही वाचविले.
खेलजी पाटील अन् पंतांनी याचा पुरावा मागताच संभूआप्पानी आपल्या अंगरख्याच्या भिजलेल्या अस्तन्या पिळून दाखवल्या,चाखून पहातात तो खरेच पाणी अगदी समुद्रातील पाण्यासारखे- खारट ! (आजही याच जागी मोठे आड असून याचेही पाणी खारट आहे) पुढे कांही महिन्यानी तो व्यापारी संभूआप्पाना शोधत- शोधत आला. संभूआप्पाची भेट होताच भरल्या अंत:करणाने संभूआप्पाच्या पायास मिठी घातली,जीव वाचवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू लागला.वाचवलेल्या जहाजावरील मालापैकी निम्मा माल अर्पण करू लागला,पण संभूआप्पानी तुकारामांप्रमाणेच ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने.....’म्हणत तो माल न स्विकारता, ‘तुझा माल आहे,तुच घेऊन जा’ असे फर्मावले. तरीही तो व्यापारी ऐकेना,अगदी आठवण म्हणून थोडेतरी काही ठेवून घ्या म्हणून गळ घालू लागला,अखेरीस चिनीमातीची व काचेची कांही नक्षीदार भांडी आणि नंतर भरजरी गलफ त्याने संभूआप्पाना अर्पण केला.( आजही ही भांडी व गलफ या घटनेची साक्ष देत आहेत.या भांड्यांची व गलफाची पूजा रमजान खुद्ब्याच्या पाचव्या दिवशी केली जाते.दिवसभर लोकांना दर्शनासाठी हे साहित्य खुले ठेवले जाते.)
* विठ्ठल दर्शन *
आषाढी एकादशीस सारा वारकरी वृंद विठ्ठलदर्शनासाठी पंढरपूरला चालला होता.पंढरपूरचा आषाढी पोर्णिमेचा काला पहाणे ही वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते.संभूआप्पाच्या मित्रांनीही विठ्ठल दर्शनाचा आणि कालापहाण्याचा आग्रह धरला.यांवर संभूआप्पा म्हणाले, ‘चला भंडारमाळीमध्ये जाऊ.’ भंडारमाळीत जाताच सर्वजण झोपी गेले. परंतु स्वप्नात चमत्कार झाला.स्वप्नातच सारे पंढरीस गेले. .सर्वांनी डोळे भरून गोपाळकाला पाहिला.चंद्रभागेत स्नान,विठ्ठलदर्शन सारे काही यथासांग पार पडले.काला करून सारे मागे फिरले आणि इकडे हळूहळू पहाट होऊ लागली.जो तो झोपेतून उठून बसला.साऱ्याच्या लक्षात आले.विठ्ठलदर्शन आणि गोपाळकाला भंडारमाळीतच संभूआप्पानी घडविला आपले पै पाहुणे भेटविले.( आजही गोपाळकाला दिवशी दिंड्याचे प्रथम भजन येथेच होते.
* संकट¬- मोचन *
श्री संभूआप्पानी आपल्या देखरेखीखाली बुवाफन महाराजांचा मठ बांधण्याचा,तसेच स्वत: जिवंत समाधी घेण्याचा संकल्प केला होता,त्यानुसार त्यांनी समाधी स्थळाचे बांधकामही सुरु केले.गडी-गवंडी मोठया श्रेध्देने बांधकाम कार्यास लागले.त्यांना पगारापोटी मठातच डाव्या कोपऱ्यात असणाऱ्या लिबांच्या झाडाच्या काड्या संभूआप्पा देत असत.परंतु त्या काड्या गवंडीही मोठया श्रेध्देने काम केलेले असेल आणि ज्याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे त्याला वस्तू प्राप्ती होत.मग कोणास सोन्याच्या,कोणास चांदीच्या तर कोणास तांब्या पितळेच्या!
* शक्कर गंज *
याच लिंबाच्या झाडातून साखर पडत असे,साखरेचा ढीग झाडाच्या बुंद्याजवळ साठलेला असे.लिंबासारखा कडू असणाऱ्या झाडामधून गोड साखर पडणे हा एक अदभूत चमत्कारच होता,म्हणूनच आजही भक्तगण ‘ धीन’ गाजवताना,
से शक्करगंजी बुवाफन की दस्तोरधीन l
( साखरेचा ढीग निर्माणाऱ्या बुवाफनांचा धीन)
असा उल्लेख करतात.
( मतीतार्ध : दुष्ट, कटू, कपटी प्रवूर्तीचे लोकही संभूआप्पा बुवाफन यांच्या सहवासामुळे प्रामाणिक तेजस्वी, ज्ञानी, गोड प्रवृतीचे होत.)
* समाधी *
बुवाफन महाराजांना गुरु मानून वारकरी सांप्रदायावर निष्ठा अन् श्री विठ्ठलराव अपार भक्ती असणाऱ्या उरुण-इस्लामपूर आणि परिसरातील अपार भाविकाना भक्तिमार्गाची आवड लावणाऱ्या या विभूतीने ‘मंगळवार, पौष वद्द नवमी शके सोळाशे त्रेसष्ट’.यादिवशी अमाप भक्तगणांच्या साक्षीने आपल्या गुरुंच्या समाधीस्थानाशेजारी जिंवत समाधी घेऊन आपले इहलोकीचे अवतारकार्य संपविले आणि गुरुंच्या चरणाशी एकरूप झाले.
* समाधीनंतर *
श्री संभूआप्पानी जिवंत समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पत्नी इरुबाई व मुलगा श्री बाबूआप्पा यांनी मठाचा कार्यभार पहाण्यास सुरुवात केली.श्री.बाबुआप्पा हे पहिले मठाधिपती झाले.
कार्तिक पौर्णिमा हा श्री संभूआप्पाचा जन्मदिवस मानला जातो,त्यांच्या समाधीनंतर याच दिवशी ‘उरूस’ भरविण्याची तसेच चार दिवस आधी म्हणजे दशमी दिवशी पाच चांदण्या ( भाग ) असणाऱ्या नक्षीदार कापडी मंडप चढवून,गूळ वाटून ( सध्यासाखर ) आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.
श्री संभूआप्पाच्या पत्नी इरुबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांचीही समाधी संभूआप्पाच्या समाधीच्या मागे डाव्या बाजूस बांधण्यात आली.बाबुआप्पांनंतर दुसरे संभूआप्पा यांनी मठाधिपती म्हणून कार्य पुढे चालवले.
* गळफाखालून पैसे *
तिसरे मठाधिपती श्री.बापूसाहेब यांनी मठ विस्ताराने आणि विकासाचे कार्य हाती घेतले.श्री.संभूआप्पाच्या चरणी जे ‘नगारे’ अर्पण करण्यात आले होते,तसेच ज्या नगारे वादनाने संपूर्ण उरुण-इस्लामपूर मध्ये मठातील विविध उत्सवांची माहिती दिली जात होती.त्या नगार्यासाठी ‘नगारखाना’ बांधून घेतला.तसेच दोन्ही समाध्यांभोवती अत्यंत देखणे,मजबूत व वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना ठरावा अशी मठाची ‘तटबंदी’ ही त्यांनी करून घेतली.या काळातील उत्कृष्ट व मजबूत बांधकामाची साक्ष आजही मठाचे मुख्य प्रवेशव्दार,दक्षिणव्दार व पूर्वव्दारच्या रूपाने दिसून येते.बांधकामाबाबतही एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की,बांधकाम करणाऱ्या गडी-गंवड्याचा पगार भागवण्यासाठी श्री.बापूसाहेब,श्री संभूआप्पाचे गलफाखाली हात घालीत.हाताला जे पैसे लागत ते न मोजता गडी-गंवडयांना देऊन संतुष्ट करत.
* यात्रेकरूंची सेवा *
गेल्या शतकातील गोष्ट म्हणजे,नेहमी प्रमाणे मठाचे सर्व दरवाजे बंद करून मठकरी झोपले असता कांही यात्रेकरू आले. त्यांनी मठाचा दरवाजा ठोठावला परंतु मठकर्यांना जाग आली नाही.आपल्या भक्तांची हाक ऐकून स्वत: श्री संभूआप्पानी ( वेष बदलून ) दरवाज्याची कडी काढून सर्वांना मठात घेतले.इतकेच नव्हे तर सर्व यात्रेकंरुच्या भोजनाची उत्तम व्यवस्थाही केली आणि अंतर्धान पावले.
* तीर्थयात्रा *
सुमारे पन्नास वर्षापूर्वी गांवातील कंठाणे-झंत्रे कुटुंबीय काशी यात्रेच्या प्रवासास गेले होते.पायी प्रवास करीत असता आमावास्येच्या काळोख्या रात्री नेमका मार्ग सापडेना.मनात अस्व्स्थता आणि चलबिचल सुरु झाली.अशावेळी त्यांनी अंत:करणातून श्री संभूआप्पाचा धावा सरू केला.थोड्याच वेळात त्या काळोख्या अंधारातून एक बालक आले व त्याने योग्य मार्ग दाखवला,ते बालकरूप अर्थातच श्री संभूआप्पा!
* भक्तांसांठी सोबत *
आपल्या भक्तांसांठी श्री संभूआप्पा रात्री-अपरात्री मठाच्या दरवाजाची कडी काढत व दरवाजा उघडून आत घेत अशा प्रकारचे अनुभव उरुणातील कै.धोंडी राजमाने,कै.दाजी पवार यांनाही आल्याचे आज त्यांचे वंशज सांगतात.कै.धोंडी राजमाने,कै.दाजी पवार हे मध्यरात्री बहे येथे नदीवर स्नानासाठी जात व तेथून संभूआप्पा साठी पाण्याची घागर अंधारातून,काट्या-कुट्यातून येत असत.अशा वेळी विविध रुपांतून श्री संभूआप्पानी त्यांना सोबत दिल्याचे सांगितले जाते.
* दिव्य *
काही वर्षापूर्वी श्री.संभूआप्पा समाधी स्थानाच्या गाभार्यात लाईट फिटींगचे काम करीत असताना,एक चौकोनी दगड निखळून पडला.आत मध्ये एक छोटीशी पोकळ जागा होती,त्यामध्ये काही जुने मोडी लिपीतील कागद व लसणी मोठा खडा आणि तांबूस रंगाचे इतर खडे असणारी माळ सापडली.सविस्तर अभ्यास करता असा बोध निघाला की,पूर्वी ‘दिव्य’ करणेसाठी याचा वापर करीत.दिव्य याचा अर्थ काही माणसे तलवार घेऊन मठात येत.दोघांचीही बाजू ऐकल्यानंतर निवाडा करणेसाठी दोघांनाही बहे येथील डोहात स्नान करून ओल्या पडदीने हातात प्रज्वलीत केलेला दिवा घुऊन येण्याबद्दल सांगितले जायचे.ज्याच्या हातातील दिवा मठ येईपर्यंत विझून जाईल तो दोषी आणि ज्याच्या हातातील दिवा मठात आल्यानंतरही टिकून राही त्यांची बाजू सत्य मानून निवाडा केला जाई,अशा प्रकारची आख्यायिका परिसरातील लोकांकडून ऐकायला मिळते.
श्री संभूआप्पांची आरती डाऊनलोड करा.
|
|