पिर संभुआप्पा-बुवाफन देवस्थान,उरुण–इस्लामपूर
॥ से शक्करगंजी बुवाफन की द्स्तोर धीन । श्री संभुसाबकी द्स्तोर धीन ॥ श्री क्षेत्र संभूआप्पा- बुवाफन देवस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर सहर्ष स्वागत.....

श्री संभूआप्पा मठ,उरुण –इस्लामपूर वास्तुरचना व उरूस

      राष्ट्रीय एकात्मता,हिंदू-मुस्लिम ऐक्य व गुरुशिष्य प्रेमाचे प्रतिक असणारा हा ‘श्री संभूआप्पा बुवाफन’ मठ उरुण भागात श्री यमाई तलावासमोरील विस्तीर्ण व प्रशस्त जागेत उभारला आहे.वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनही याचे वर्णन करता येईल.

      श्री संभूआप्पा- बुवाफन यांच्या समाधीस्थळावरील गोल घुमुट,त्यावरील चंद्रकोर,कोपर्यातील कोरीव दगडीखांब ऐतिहासिक कलेली साक्ष देतात.

      गुरु बुवाफन यांची समाधी ( तुरबत व आतील गाभारा तुलनेने प्रशस्त व थोडीशी गादी अग्रभागी आहे.तर श्री संभूआप्पाची समाधी गाभारा थोडासा लहान व गुंरूच्या थोडा मागे आहे.

      मठाचे प्रवेशव्दार प्रशस्त,ओवऱ्या असणारे व आकर्षक आहे.दक्षीण व पश्चिमव्दार तुलनेने लहान आहे.पूर्वव्दार अपूर्व अवस्थेत आहे.

      मठाभोवती दगडीबांधकामातील प्रचंड तटबंदी असून बुरुज आहेत.

      मुख्य प्रवेशव्दारातून प्रवेश करताच उजव्वा बाजूस श्री संभूआप्पाकालीन मोठे ‘आड’ असून ते खूप खोल असल्याचे सांगितले जाते,याचे पाणी खारट आहे.मार्गाच्या डाव्या बाजूस बगीचा आहे.

      आणखी एका छोट्या दरवाज्यातून आत येताच प्रथम बुवाफन समाधी व नंतर श्री संभूआप्पा समाधी आहे.प्रथम गुरु बुवाफन व नंतर श्री संभूआप्पा समाधीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.

      समाधीस्थळांसमोर डाव्या कोपऱ्यात असणारे लिंबाचे झाड शुध्द भाव आणि मधुरतेची ऐतिहासिक साक्ष देत उभे आहे.तर याच्या समोरच श्री संभूआप्पाच्या बैठकीचे आसन आहे.

      बुवाफन समाधीच्या डाव्या बाजूस ओवरीवर ‘ भंडार माळी,’ त्याच्याच शेजारी दुसऱ्या मजल्यावर ‘ नगारखाना’ आहे.याला लागूनच मठाधिपतींचे निवासस्थान आहे.

     समाधीस्थानांभोवती भक्तांसाठी ‘ओवऱ्या’ आहेत श्रीसंभूआप्पा समाधीच्या उजव्या बाजूस ‘सोनार सोपा’ आहे.परगावच्या सोनार समाजाने यात्रेत निवासाची सोय व्हावी म्हणून स्वखर्चाने बांधलेला सोपा.त्याला लागूनच माजी मठाधिपतींचे ‘समाधीस्थान’ आहे.

      त्याला लागून श्री संभूआप्पाच्या पत्नी इरुबाई तसेच इतर मठाधिपतींची समाधीस्थाने आहेत.

      श्री संभूआप्पाचे समाधीच्या मागील बाजूस श्री संभूआप्पाचे मित्र खेलजी पाटील यांची समाधी आहे.

      दोन्ही समाधीच्या मागील बाजूस असणारी नारळाची दोन उंच झाडे मठाच्या सौदर्यात भर घालतात.पूर्वी इथेच ‘ भेदिक’ गाण्याची प्रथा होती.

      कोपऱ्यातील दगडी गोलगुंड भाविकांच्या शारिरीक शक्तीची अन् कौशल्याची कसोटी घेणारा ठरतो.

     मठाचे बाहेरील बाजूस ‘तुळशी’ कट्टा’ असून पूर्वी कार्तिक चतुदर्शी दिवशी इथूनच भिक्षेहून आलेल्या महंत फकिंराचे पुढे लिबांच्या झाडापर्यत ‘कळवाती’ नाचण्याची प्रथा होती.

      लिबांच्या झाडाच्या डाव्या बाजूस ‘ चांभार सोपा’ आहे ( परगांवच्या चांभार समाजाने यात्रेतील आपल्या निवासाच्या सोयीसाठी बांधलेला.)

      दोन्ही समाध्यासमोर चौकोनी आकाराचे प्रशस्त पटांगण असून पूर्वी येथे यात्रेत कुस्त्यांचा फड भरविला जाई; सध्या या जागेवर कायमस्वरूपी,भव्य मंडप उभारला आहे.

      मंडपाच्या लगतच कट्टा असून यात्रेत इथे विविध कार्यकर्माचे आयोजन केले जाते.

      यापूर्वी यात्रा कालावधीत सलग पाच दिवस श्री.वाठारकर बुवा यांचे हरिदासी किर्तन होत असे.शंकराचार्याचे वडील हरिभाऊ कऱ्हाडकर,जगद्गुरु शंकराचार्य ( पूर्वाश्रमीचे रामचंद्र बुवा कराडकर ) या नामवंताची किर्तन सेवा होत असे.

     सन १९५६ पासून शाहीर- विशारद बापूराव विभूते ( बुधगांवकर) यांच्या सलग तीन दिवस पोवाड्याची प्रथा सुरु झाली. तिसरे दिवशी श्री.संभूआप्पाचा पोवाडा सादर केला जातो.सध्या ही परंपरा त्यांचे सुपुत्र शाहीर आदिनाथ विभूते चालवित आहेत.

      गेल्या दहावर्षापासून शाहिर यशवंत पोवार ( रेठरेधरण) हे ही पोवाड्याव्दारे सेवा करतात.

      यात्रा सुमारे दहा दिवस चालते.यात्रातील ‘बैंलाचा बाजार’ हा संपूर्ण महाराष्ट्रlतील मोठा मानला जातो.अनेक तमाशा कलावंत वंशपरंपरा आपली सेवा यात्रेत सादर करतात

      काळानुरूप यात्रेचे स्वरूप बदलत असले तरी त्यातील उत्साह,गर्दी कायम टिकून आहे.

      सध्या हा मठ चँरीटीकमिशन सार्वजनिक ठरविलेला असून त्याचे विश्वस्त वंशपरंपरेने ज्येष्ठपुत्राकडे होण्याचा नियम आहे.

      सध्याचे मठाधिपती श्री.रामचंद्र बुवासाहेब मठकरी यांनी अजिंक्य कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने अनेक विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने कायमस्वरूपी मंडप उभारणी,आडातील गाळ काठून पाणी स्वच्छता, बगीचा- फुलझाडे- वृक्षारोपण,विविध ठिकाणी फरशी बसविणे,विविध समाजप्रबोधनात्मक कार्यकर्माचे नियोजन, अस्पृश्यता निवारण,पुढील पिढीसाठी सविस्तर माहिती व संभूआप्पा चरित्र पुस्तकरूपाने प्रकाशित करणे,यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.


श्री संभूआप्पांची आरती  डाऊनलोड  करा.