श्री संभूआप्पाचे संक्षिप्त जीवनचरित्र
श्री संभूआप्पा मूळचे मिरजेपासून पूर्वेस सुमारे १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मालगावचे.गावच्या वेशीपाशीच बुवाफन महाराजांचा मोठा दर्गा आहे.बुवाफन यांचा कार्यकाल श्री संभूआप्पाच्या पूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वीचा सांगितला जातो.त्या काळात अनेक वेषात बुवाफननी दृष्टान्त दिल्याचे सांगितले जाते. लहान मुलांमध्ये खेळणारा,रममाण होणारा एक गोंडस,गुटगुटीत,सोनेरी केसांचा बालक –सर्वाना आकर्षित करून घेणारा.हा नेमका कोण ?कुठून आला ? वगैरे कुणालाच पत्ता नाही.सोनेरी केसांच्या अपेक्षेने एकाने त्याचे केस धरू पाहिले.तर तो जमिनीत अंतर्धान पावला,हाती फक्त सोनेरी केसच राहिले,त्या केसांची पूजा होऊ लागली.एका भक्ताने ते केस मोठ्या भक्तीपोटी आपल्या गावी शिरोळ येथे नेले व तिथे स्मारक उभारले; ‘श्री बाबय्या स्वामी उर्फ बुवाफन महाराज मठ.’ मालगाव मध्येच फकीर वेषात पुन्हा अवतार घेवून मोठया प्रमाणावर समाजकार्य करणारे ‘बुवाफन’त्याच्या पश्चातही अनेक शिष्यगण तयार झाले,त्यांपैकीच एक –श्री संभूआप्पा !
मालगावच्या सालमाळगे घराण्यात पारंपारीक हातमागावर वस्त्र विनण्याचं प्रामाणिक कार्य करणारे संत प्रवृत्तीचे श्री संभूआप्पा ! श्री बुवाफन महाराजांवर त्यांची अपार निष्ठा.दररोज सूर्योदयापूर्वी १३ किमी वरील कृष्णा नदीत स्नान करून ओल्यापडदीने डोक्यावरून पाण्याची घागर आणून त्या पाण्याने बुवाफन-समाधीस स्नान घालावे,मनोभावे पूजा करावी व तद्नंतर आपल्या व्यवसायास आरंभ करावा हा त्यांचा नित्यनेम,अनेक वर्षापासून जोपासलेला.त्या काळी घरोघरी जावून सूत गोळा करण्याची प्रथा होती.गोळा केलेले सूत एकत्रित करून त्याचे हातमागावर वस्त्र विणावे,घोडयावरून किंवा चालत जाऊन बाजारात ते वस्त्र विकावे व चारीतार्थ चालवावा ही दिनचर्या.
एके दिवशी एका स्त्रीने संभूआप्पाना सूत नेण्यासाठी घरी बोलावले .खंर-तर दारातच सूत आणून देण्याची त्या कालची पद्धत; मात्र या स्त्रीने संभूआप्पाना घरात येण्यास सांगीतले.पुढील आतील खोलीत या सूत देते असे सांगताच संभूआप्पानी त्या स्त्रीच्या मनातील ‘मोह’ ओळखला आणि तेथून पळ काढला.एवढयावर ती स्त्री गप्प बसली नाही.तिला झाला प्रकार स्वत;चा अपमान वाटू लागला;तीने संभूआप्पाविरुध्द पोलीस पाटलांकडे तक्रार केली.अर्धात पोलीस पाटील त्या स्त्रीला आणि संभूआप्पाना चांगलेच ओळखत असल्याने त्यांनी कोणतीही दखल न घेता फक्त ऐकून सोडून दिले.परंतु ती स्त्री अपमानाचा सूड घेण्यासाठी पेटून उठली होती.तिने पोलीस पाटलांना संभूआप्पावर काय कार्यवाही केलीत ?तुमच्या हातून होणार नसेल तर मी वरिष्ठांकडे दाद मागीन’असा दम देण्यास सुरुवात केली.पोलीस पाटलांनी मनात विचार केला, ‘जर खरोखरीच या स्त्रीने वरिष्ठांकडे तक्रार केली तर संभूआप्पा सारख्या सज्जन माणसाची नाहक बदनामी होईल.’ त्यापेक्षा आपणच यातून कांही मार्ग काढावा.या भावनेने पोलीस पाटलांनी त्या स्त्रीला समजुती खातर केवळ चौंकशीचा देखावा करण्याचे ठरविले.केवळ औपचारीकपने संभूआप्पाना चावडीवर हजर होण्यासाठी बोलावणे धाडले.हातातील काम तसेच टाकून संभूआप्पा लगोलग चावडीवर हजर झाले.पोलीस पाटलांनी ‘काही नाही! तुम्ही जा,काम झाले !’ इतकेच सांगितले.
परंतु या घटनेचा संभूआप्पासारख्या सज्जन व हळव्या मनावर फार मोठा आघात झाला.अपराधीपणाच्या भावनेने घर केले.नाहक बदनामी सहन करीत लाजिरवाणे जीणं जगण्यापेक्षा गाव सोडण्याचा निर्णय रातोरात घेतला.मच्छिंद्रगडाची वाट धरली पण तेथेही मन रमेना.मन करवीर क्षेत्री आकर्षित झाले.मच्छिंद्रगडाकडून करवीरकडे येतांनाच वाटेत ‘उरुण’गांव लागले.तेथे मुक्काम केला.पहाटे आपल्या गुरुंची- बुवाफन महाराजांची आठवण झाली;तिथून चालत कृष्णा नदी गाठली.स्नान केले,व ओल्या पडदीने मालगांवला जाऊन बुवाफनसमाधीची मनोभावे पूजा केली व पुन्हा उरुणात आले.मग उरुणातच विसावले.खेलजी पाटील,आप्पाजी कुलकर्णी यांसारखे सहकारी भक्त लाभले.पुन्हा आपला पारंपारीक व्यसाय सुरु केला.रोज एक वस्त्र हातमागावर विणावं,बाजारात नेऊन विकावं आणि उदरनिर्वाह करावा असा नित्यक्रम चालू झाला.परंतु दररोज पहाटे मालगांवला जाऊन गुरुंच्या समाधीची पूजा कधीच चुकली नाही.दिवस उजाडण्यापूर्वीच गुरुंच्या समाधीची पूजा आटोपून संभूआप्पानी उरुणचा रस्ता धरलेला असे.एक नव्हे,दोन नव्हे तर सलग बारावर्षे हा नित्यक्रम चालू होता.अनेक संकटे आली पण शिष्य गुरुभक्ती पासून वंचित होऊ शकला नाही की एकही दिवस समाधी पूजेचं खाडे झाले नाही.एकवेळ तर कृष्णेस महापूर आलेला. काय करावे कळेना,पलिकडे कसे जावे याचा बोध होईना.संभूआप्पानी डोळे झाकले आणि आपल्या गुरूचा धावा केला.मुखाने गुरूच्या नामाचा जप करीत खांद्यावरील घोंगडी पाण्यात सोडली अन् मोठया निष्ठेने स्वत:त्या घोंगडीवर बसले:आश्चर्यlची गोष्ट म्हणजे संभूआप्पासहीत घोंगडे पाण्यावर तरंगु लागले आणि संभूआप्पा विनासायास पैलतीरी पोहोचले,सत्वपरीक्षेतून पार झाले.शिष्याची अपार भक्ती पाहून,आता यापुढे भक्ताला त्रास द्यायचा नाही या जाणीवेने बुवाफनमहाराजांनी संभूआप्पाना दृंष्टात दिला,आणि सांगितले, ‘आता माझ्या दर्शनासाठी तू मालगावला येण्याचे कष्ट घेऊ नकोस,मीच तुझ्याकडे भेटीसाठी येईन.’ पण आपण आल्याचे कसे कळणार ?’यावर बुवाफाननी सांगीतले,’ ‘मी अनंत चतुदर्शीस `तुझ्या भेटीस येईन.तुझ्या हातमागावरील डबर्यातून ऊदाचा धूर आणि वास निघेल आणि एक सुळका दृष्टीस पडेल,त्याचवेळी मी आलो आहे असे समज.’ संपूर्ण उरुणात बुवाफन संभूआप्पाच्या भेटीस येणार ही वार्ता कळाली,आणि हा अपूर्व सोहळा अन् आश्चर्य डोळ्यात साठवून ठेण्यासाठी अलोट गर्दी उसळली.ठरल्याप्रमाणे अनंत चतुदर्शीस सुळका वर आला.संभूआप्पाच्या हातमागावरील डबर्यातून ऊदाचा धूर आणि वास यांनी आसमंत भरून गेले. गुरु-शिष्य भेटीचा अपूर्व सोहळा ज्यांनी अनुभवला ते भाग्यवंत ठरले !
दुसऱ्याच दिवशी संभूआप्पापुढे पेच पडला,हातमागाच्या ज्या डबर्यातून गुरु प्रकट झाले,ते स्थान पवित्र झाले; मग आता त्या ठिकाणी पाय कसा ठेवावा?प्रत्यक्ष गुरुस्थानी पाय ठेवण्यासाठी मन धजेना. अन् मग त्या दिवसापासून हातमागावर वस्त्र विणणे बंद झाले.शिल्लक साधनसामग्रीवर कसे बसे २-४ दिवस गेले अन् नंतर चूलही बंद झाली.दररोज सोंगट्या खेळणाऱ्या मित्रांच्या लक्षांत आले,की सध्या घरातील चूल पेटलेली दिसत नाही.संभूआप्पास जेवणाबद्दल विचारले तर,प्रत्येक वेळेस आत्ताच जेवलो! असे खोटेच सांगत.खोदून खोदून विचारल्यावर मात्र संभूआप्पाना वस्तुस्थिती सांगावी लागली.एक दिवस एकाने,दुसरे दिवशी दुसऱ्याने असे करीत भोजन देणांऱ्याची आणि अप्रत्यक्षपणे भ्क्तांचीही संख्या वाढू लागली.येणाऱ्या भक्तास संभूआप्पा आपुलकीने हिताच्या चार गोष्टी सांगत.संसारी जीवास उपदेश करत.अस्पृश्यता,जातीभेद अशा बाबीत समाज प्रवाहाच्या विरूद्ध जावून जातपात न मानता आचरणातून समाजमनावर सर्वसामन्याच्या अंत:करणाचा ठाव घेणारा संभूआप्पा भक्तगणांना ‘देव’ वाटू लागले.
श्री संभूआप्पांची आरती डाऊनलोड करा.
|
|