मठातील नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम
*खंडे प्रतिपदा पूजन*
* दीपावली पाडवा म्हणजेच कार्तिक शुध्द प्रतिपदेस ‘खंडेपूजन’ यामध्ये श्री संभूआप्पानी वापरलेला हातमाग तसेच सर्व इतर हत्यारे ( तलवार,कुदळ,पार,कुऱ्हाड वगैरे) यांचे पूजन केले जाते.याच दिवशी कुडळ मारून मठ रंगविण्यासाठी ‘मुहूर्त’ केला जातो.
* कार्तिक शुध्द पंचमी ते दशमी पर्यत चुना व निळ यांव्दारे संपुर्ण मठ रंगविण्यात येतो.माळी समाजास हा मठ रंगविण्याचा मान पूर्वी होता.
* कार्तिक शुध्द नवमीच्या सायंकाळी गावंlतील प्रमुख ठिकाणी उद्या मंडप उभारण्यास येण्याविषयी निमंत्रण वजा दंवडी,दिली जाते.यावेळी शिंग फुंकण्याचा मान शिंगाडे ( चौधरी ) यांना आहे.
* कार्तिक सुध्द दशमीस सकाळी मंडप दुरुस्ती ( शिवण ) सुरु होते.हा मान चांभार समाजास असून इतर ग्रामस्थही दोऱ्या बांधणे वगैरे कार्यात मोठया उत्साहाने सहभागी होतात.पूर्वी पांच चांदण्या ( भाग ) असणारा नक्षीदार असा मोठा कापडी मंडप होता.मंडप ज्या चार लाकडी खांबाच्या आधारावर उभारला जातो.ते खांब म्हणजे विविध जातीधर्माच्या आधारावर उभारणाऱ्या एकतेच्या छत्राचे आधारस्तंभच आहेत.बुवाफन समाधी समोरील पहिला खांब पाटील तर दुसरा खांब पवार मंडळी उभारतात.श्री संभूआप्पासमाधी समोरील पहिला खांब शिंपी मंडळी तर दुसरा खांब हरिजन मंडळी उभारतात.विशेष म्हणजे मंडपातील खांबाच्या या स्थानानुसार या समाजातील लोकांच्या वस्त्या आहेत.मंडप चढविल्यानंतर मठाधिपतींच्या वतीने प्रसाद म्हणून साखर ( पूर्वी गूळ ) वाटण्यात येते व यात्रेस सुरुवात होते.याच दिवसापासून पोर्णिमेपर्यत काही भक्तगण ‘मंडपाखालचे’ रोजे’ करतात.
* मंडप चढलेल्या दिवशी सायंकाळी मठाचे महंत फकीर श्री डोंगरे ( कडेगांव ) व श्री.वायचळ (उरुण इस्लामपूर )यांच्या घराण्यातील तसेच मठकरीच्या घरातील कुटुंबीयांना ‘ फकीर’ केले जाते.
* कार्तिक पोर्णिमा व पोर्णिमेच्या आधी दोन दिवस असे एकून तीन दिवस नवसाचे फकीर केले जातात.फकीर होण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक प्रांतातून हजारो भाविक येतात.फकीर होणाऱ्याच्या गळ्यात निळ्या रंगाची कफनी ( सुमारे दीड फूट लांब व दोन इंच रुंद ) घातली जाते.उजव्या हातात गुलाबी दोरा (अटी )बांधला जातो.प्रसाद म्हणून कुंभारांनी केलेल्या मातीच्या कुंडाभात,त्यावर आवळ्याचे लोणचे दिले जाते.प्रसादाचा भात शिजवण्याचा मान माळी समाजाकडे आहे.
* कार्तिक पोर्णिमेदिवशी उरुणातील सर्व घरांमध्ये किमान पाच फकीर संभूआप्पाचेच रूप समजून पुजले जातात.त्यांना कुंड्यातून मलिदा व डाळभात खायला दिला जातो.यथाशक्ती दक्षिणा दिली जाते व धीन गाजिवला जातो.
* तुळशी विवाहाच्या दिवशी श्री.सुनिल व बंडोपंत गोटखिंडे यांच्या वतीने श्री बुवाफन व श्री संभूआप्पा यांच्या दोन्ही घुमूटाना एकत्रित रित्या कापडी धज बांधला जातो व नंतर तुळशी विवाह पार पाडला जातो.
* कार्तिक पोर्णिमेच्या आदल्या दिवशी संदल म्हणजे गंधरात्र केली जाते.
* गलफ *
* कार्तिक वद्द प्रतिपदेस मानाचे गलफ घालण्यास सुरुवात होते.पहिला गलफ शासनाच्या वतीने उरुणातील पोलीसपाटील यांचे घरातून येतो.
*दुसरा मानाचा गलफ श्री.मगदूम ( रा.गोटखिंडे ) यांचा उरुणातील श्री.महादेव मंदिरापासून वाजत आणला जातो.
* तिसरा मानाचा गलफ शिंपी गल्लीतील महंत फकीर श्री.वायचळ यांचे घरातून वाजत येतो.
* यानंतर ग्रामस्थत भाविकांच्या वतीने गलफ अर्पण करण्यास सुरुवात होते.
* कार्तिक पोर्णिमेस महंतफकीर मठातील आडावर स्नान करतात.
* गुरुप्रसाद *
कार्तिक पोर्णिमेच्या ५ व्या ते ७ व्या दिवशी गुरु करण्याचा समारंभ होतो.यावेळी सर्व मानकर्यांना ‘ गुरुप्रसाद’ दिला जातो.याचवेळी महंत फकींराकडून मठाधिपतींकडे ‘झोळी’ सुपूर्द केली जाते.
* भासणें *
रमजान ईद झाल्यानंतर पाचव्या दिवशी सौदागराने ( व्यापारी ) श्री संभूआप्पाना अर्पण केलेली काचेची व चिनी मातीची भांडी यांची पूजा केली जाते.या सर्व भाड्यांमध्ये सर्वप्रकारच्या भाज्या,मिठाई व सर्व प्रकारच्या धान्याचे पदार्थ घातले जातात.सौदागरने अर्पण केलेली भरजरी गलफ समाधीस घातले जातात व नैवेद्य दाखविला जातो.
या कार्यक्रमास सर्व मानकर्यांना निमंत्रित केले जाते.श्री.मुलाणी कुराणवाचन करतात.
*पोर्णिमा व पोर्णिमेनंतर नवस फेडले जातात. यामध्ये गलफ घालणे,दंडस्नान,लोटांगण,फकीर होणे,नारळाचे तोरण बांधणे, पेढे वाटणे,असे प्रकार असतात.
* संदल ( गंधरात्र ) *
संदल म्हणजे समाधीस चंदनाची उटी लावणे व संपूर्ण गाभाऱ्यात उदाचा धूर करणे.वर्षातुन चार वेळा हा संदल ( गंधरात्र ) होतो.
(१)कार्तिक पौणिमेच्या आदल्या दिवशी.
(२)श्री संभूआप्पाच्या समाधी दिनी ( पौष वद्द नवमी )
( दुसऱ्या दिवशी मठकरी कुटुंबियांच्या वतीने गलफ अर्पण केला जातो )
(३) बुवाफन उरुणात प्रथम आले ( सुळका व धूर स्वरुपात ) तो दिवस ( अनंत चतुर्दशी )
(४) महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी भांडारा असतो, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच माघ वद्द एकादशीस संदल होते.
संदल ( गंधरात्र ) वेळी सर्व महंत फकीर व मानकरी उपस्थित असतात.
प्रत्येक संदल ( गंधरात्र ) नंतर पाकाळणी करण्यात येते म्हणजेच समाधी स्थानाचे व परिसर धुऊन स्वच्छ केला जातो.
* भंडारा *
पूर्वी स्वत:मठाधिपती हाती वेताची काठी व झोळी घेऊन लवाजम्यासह भिक्षेसाठी सर्व मानकर्यांसह गावातील मानकर्यांच्या घरी जात.भिक्षा म्हणून ज्वारी ( धान्य ) सुपाने झोळीत ओतले जायचे.उरुणामध्ये भिक्षेसाठी फिरतांना मठाधिपतींनी बसण्याची काही ठिकाणी निश्चित होती.
(१)सुरुवात शिंपी गल्लीतील महंतफकीर श्री.वायचय यांचे घरापासून
(२)कुंभार वाडा ( नारसोंबा मंदिर – पाराखाली )
(३)हरिजन वाडा- परिट वाड्याजवळ ( उरुणात )
(४)ज्ञानू बुवाजी पाटील मंडपाशेजारी- पाराखाली
(५)दादू जाधव,तानाजी चौक
(६)वर्णे टेलर ( टिळक पथ पोस्ट )
(७)मोमीन मोहल्ला.
*माघ वद्द व्दादशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी सायंकाळी मानकर्यांनासह सर्व ग्रामस्थांना भोजन दिले जाते.मठाच्या दक्षिणेस असणाऱ्या शिंपी गल्लीसाठी मठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली व महंत फकीर श्री.वायचळ यांच्या आधिपत्याखाली स्वतंत्रपणे भंडारा होतो,यासाठी लागणारा शिदा व इंधन मठाधिपतींकडून पुरविला जातो तर गाजराचे लोणचे (श्री.गोंदकर),दूध-तूप ( श्री.महाडिक ) यांचे वतीने दिले जाते.महंत फकीर श्री.वायचळ यांचेकडून नैवेद्य दाखविला गेल्यानंतर भंडाऱ्यास ( भोजनास ) सुरुवात होते.यावेळी पंक्तीतून उदी फिरविणे,धीन गाजविणे होते.
*कार्तिक शुध्द दशमी ते चतुदर्शी पर्यत मठाधिपती यांचे वतीने भिक्षा मागण्याचा मान महंत फकीर श्री.वायचळ यांचेकडे आहे.गेल्या ९ पिढया हा मान कायम असून सध्या
श्री. पांडूरंग जनादर्न वायचळ व त्यांचे बंधू दिगंबर.वासुदेव व सदाशिव यांचेकडून ही परंपरा जोपासली जात आहे.या भिक्षेमध्ये गावातील मानकऱ्यांच्या घरातून भाकरी-चटणी भिक्षा म्हणून स्विकारली जाते व मठाधिपतींच्या हस्ते ती सेवेकऱ्यांना प्रसाद म्हणून दिली जाते.
* गोपाळकाला *
आषाढी एकादशीस मठामध्ये निळे निशाण लावले जाते.त्याच्या पाचव्या दिवशी उरुणातील सर्व वारकरी दिंड्यांना निमंत्रण केले जाते.सर्व दिंड्या सायंकाळी मठामध्ये येतात.( मुळे भजनी मंडप,लोणारी भजनी मंडप,ज्ञानू बुवाजी पाटील भजनी मंडप,पवार भजनी मंडप, रोहिदास भजनी मंडप, बुरुड गल्ली भजनी मंडप वगैर ) प्रत्येक दिंडी जिथे पूर्वी श्री संभूआप्पानी भक्त मित्रांना विठ्ठल दर्शन घडविले होते त्या भंडारामाळीत जाते, तिथे मठाधिपतींसमोर गुरुपर अभंग होतो.सर्व वारकर्यांना सुवासिक अत्तर व टोपी मध्ये चंदनाच्या पानांचा तुरा लावला जातो.नंतर आपापल्या ठराविक जागी दिंड्या नामाचा गजर करतात.कांही वेळाने मठाधिपती आपल्या पारंपारिक वेषात सर्व दिंड्याचे बांधलेल्या दर्शन घेतात व सर्व दिंड्याची एक दिंडी होऊन उरुणातील ठराविक मार्गाने दहिहंडी बांधलेल्या ठिकाणी येतात.गोल रिंगण होते. सध्या सपकाळ घराण्यातील व्यक्ती दहीहंडी फोडते. दहीहंडीचे खापर मिळविण्यासाठी झुंबड उडते, कारण हे खापर घरी ठेवताच घरात सुख-समृद्धी, भरभराट येते अशी श्रद्धा आहे. दिंड्या मठामध्ये आल्यानंतर मठकऱ्यांचे वतीने सर्वाना लाह्या वाटत होते, तर भजनी मंडपाना दही,लाह्या व मानाचे श्रीफळ दिले जातात.
दुसरे दिवशी सर्व वारकरी व मानकरी यांचेसाठी भोजन आयोजित केलेले असते.
* श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा *
माघ वद्द अष्टमी ते आमावस्या- श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, प्रवचन, किर्तन,काला, महाप्रसाद, यांचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते.पारायणाचा लाभ या परिसरातील असंख्य भाविक घेतात.
* श्री गणेशोत्सव *
गणेशोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना मठकरी करतात.मात्र अनंत चतुर्दशी दिवशी श्री बुवाफन ( गुरु ) आदला दिवस गंधरात्र ( संदल ) रात्री असल्याने दुसरे दिवशी गणपती विसर्जन करण्याची येथे प्रथा आहे.तसेच गणपती विसर्जन करण्याचा मान वंशपरंपरागत श्री.ढोबळे यांचेकडे आहे.
श्री संभूआप्पांची आरती डाऊनलोड करा.
|
|